राजकोट : सोशल मीडियावरील ओळखीतून सुरू झालेले मैत्रीचे नाते, त्यानंतरची लिव्ह-इन रिलेशनशिप आणि अखेर हत्येपर्यंत पोहोचलेल्या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा गुजरातमधील राजकोट येथे झाला आहे. या प्रकरणात पियुष कुमार या तरुणाला अटक करण्यात आली असून, चंदन कुमार यांच्या हत्येप्रकरणी त्याने कबुलीजबाब दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी पियुषची फेसबुकवर 'निशा' नावाच्या प्रोफाइलशी ओळख झाली होती. त्याच काळात इन्स्टाग्रामवरील 'पूनम' नावाच्या प्रोफाइलवरूनही त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. पुढील संवादातून दोन्ही प्रोफाइल एकाच व्यक्तीकडून वापरले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी हैदराबादमध्ये काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्यास सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या काळात दोघांनी परस्पर संमतीने लग्नासारखा विधीही केला होता. चंदन यांनी पियुषच्या नावाचा टॅटूही हातावर गोंदवला होता.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, काही काळानंतर पियुषला चंदन यांच्या ओळखीबाबत संशय आला. एका प्रसंगी चंदन दाढी करताना दिसल्यानंतर सोशल मीडियावर महिला नावाने संपर्कात असलेली व्यक्ती प्रत्यक्षात चंदन कुमार असल्याचे त्याला समजल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चंदन हे महिलांच्या वेशभूषेत राहत असल्यामुळे यापूर्वी त्यांची खरी ओळख समोर आली नव्हती, असेही पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पियुषने हैदराबाद सोडून उत्तर प्रदेश, राजस्थान आणि नंतर गुजरातमधील राजकोट येथे कामासाठी स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, चंदन त्याचा सातत्याने पाठलाग करत असल्याचा दावा पियुषने चौकशीदरम्यान केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 21 जून रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पियुषने चंदन यांना रेल्वे फाटकाजवळ नेऊन दगडाने डोक्यावर वार करून हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
दरम्यान, 25 जून रोजी राजकोटमधील शापर-वेरावल परिसरात रेल्वे रुळालगत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला लांब केस आणि महिलांचे कपडे असल्यामुळे तो महिलेचा मृतदेह असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्ती पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. मृताच्या हातावरील 'पियुष' नावाच्या टॅटूमुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधील काही सेकंदांच्या दृश्याच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढत पियुषला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सोशल मीडियावरील बनावट ओळख, ऑनलाइन नातेसंबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

More Stories
सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाद्वारे धडक मोहीम सुरू
वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करणार
पुणे महानगरपालिका भरती फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करणार