भिवंडीत ‘अॅमेझॉन रिटेल इंडिया’च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; दीड टन मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, परवाना निलंबित ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्याप्रकरणी कंपनीच्या फॅसिलिटी मॅनेजरसह एजन्सी मालकावर कोणगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल.

ठाणे,दि.25(जिमाका) :ग्राहकांच्या आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थांची साठवणूक आणि बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली (ता. भिवंडी) येथील 'अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'च्या गोदामावर छापा टाकून सुमारे १.५ टन मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जनआरोग्याचा विचार करून प्रशासनाने या पेढीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला असून संबंधित जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अन्न व औषध प्रशासन, ठाणे परिमंडळाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अरविंद कांडेलकर व त्यांच्या पथकाने २४ जून २०२६ रोजी सरवली येथील अॅमेझॉनच्या गोदामाची अचानक तपासणी केली. या तपासणीत सदर पेढीने 'अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६' मधील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. गोदामात ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर इजा पोहोचवू शकणारा सुमारे १.५ टन वजनाचा मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होता. तसेच, यापूर्वीचा मुदतबाह्य झालेला साठा कुठे व कशा प्रकारे नष्ट करण्यात आला, याचा कोणताही अधिकृत पुरावा कंपनीला सादर करता आला नाही.

यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी शहरात आठ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त केला होता. तपासादरम्यान सदर मुदतबाह्य अन्नाचा पुरवठा मे. अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. च्या सरवली येथील गोदामातूनच झाल्याचा दाट संशय समोर आला. अॅमेझॉन कंपनीने हा मुदतबाह्य मुद्देमाल नष्ट करण्यासाठी 'मे. आर. के. ट्रेडर्स' या एजन्सीला दिला होता. मात्र, तो नियमानुसार नष्ट न करता पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले.

या गंभीर निष्काळजीपणा आणि फसवणुकीप्रकरणी 'मे. आर. के. ट्रेडर्स'चे मालक श्री. रहमान के. आणि 'अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.'चे फॅसिलिटी मॅनेजर श्री. सोमशेखर कोनूर यांच्याविरुद्ध कोणगाव पोलीस ठाण्यात दिनांक २५ जून २०२६ रोजी गु.र.नं. ०२७७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खालील कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे:

• अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६: कलम २६(१), २६(२)(i), २७(१), २७(३)(e) आणि ३१.

• भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: कलम २७४ (भेदसळ/अन्न दूषित करणे), ३(५) आणि ३१८(४) (फसवणूक).

यासोबतच, सहाय्यक आयुक्त तथा परवाना अधिकारी (परिमंडळ-१०) श्री. योगेश ढाणे यांनी व्यापक जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने मे. अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि., सरवली, भिवंडी चा परवाना तात्काळ प्रभावने निलंबित केला आहे.

कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा अन्न व्यावसायिकाने मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट अन्न सुरक्षा व मानके कायद्यात विहित केलेल्या पद्धतीनुसारच करणे बंधनकारक आहे. असा साठा थेट बाजारात विक्री किंवा वितरणासाठी ठेवल्यास कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल. ग्राहकांनी बाजारपेठेतून किंवा ऑनलाइन माध्यमांतून खाद्यपदार्थ खरेदी करताना पाकिटावरील उत्पादन दिनांक (Manufacturing Date) आणि कालबाह्यता दिनांक (Expiry Date) आवर्जून तपासावी. ठाणे जिल्ह्यात कुठेही मुदतबाह्य किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन, ठाणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.