मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारचा एअरबॅग अचानक उघडल्याने कारमध्ये बसलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या विचित्र घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मृत तरुणाची ओळख काशीमीरा येथील टियारा हिल्स परिसरात राहणारा मोहित सोनी (वय २५) अशी झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. मोहित रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या सुमारे १५ वर्षे जुन्या होंडा कारमध्ये बसला होता. त्याचवेळी कारच्या स्टीयरिंगमधील एअरबॅग कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उघडला.
मानेवर गंभीर दुखापत
प्राथमिक माहितीनुसार, एअरबॅगचा प्लास्टिक कव्हर अतिवेगाने उडून मोहितच्या मानेच्या उजव्या बाजूस आदळला. या धडकेत त्याच्या मानेवर गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला.
यानंतर मोहितला तातडीने मीरा-भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
कारमध्येच अडकून राहिल्याने मदत मिळण्यास उशीर
पोलिसांच्या माहितीनुसार, कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याने आणि बाहेरून कोणतीही धडक किंवा अपघात झाल्याचे दिसत नसल्याने बराच वेळ कोणालाही ही घटना लक्षात आली नाही. त्यामुळे मोहित कारमध्येच अडकून राहिला. वेळेवर मदत न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
काशीमीरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली असून तांत्रिक बिघाडाची शक्यता तपासली जात आहे. कारच्या प्राथमिक तपासणीत बाहेरील धडक किंवा नुकत्याच झालेल्या अपघाताचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. कारचे फिटनेस प्रमाणपत्र वैध असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने कारमधील पुरावे आणि रक्ताचे नमुने संकलित केले आहेत. तसेच वाहनाची सखोल तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

More Stories
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे, विवरणपत्र दखल न केल्यास दहा हजारांचा दंड
प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत आढावा; मानखुर्द व बोर्ला येथील जमिनींची मोजणी करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश