नागपूर/अमरावती : अमरावतीतील गाजलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत धनराज बालकिशन राठी, श्रावण घनश्याम राठी आणि सुशील घनश्यामदास राठी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा तसेच त्यानंतरची न्यायालयीन कार्यवाही रद्द केली आहे. तक्रारीतील आरोपांमधून फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आवश्यक घटक प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा दिलासादायक निर्णय दिला. मात्र, प्रकरणातील उर्वरित आरोपींविरुद्धची कार्यवाही कायम ठेवण्यात आली आहे.
भातकुली तालुक्यातील सायत येथील जमीन प्रकरणी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात सन २०२२ मध्ये डॉ. परेश नारायणदास सोनी यांनी जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा क्रमांक ७९९/२०२२ नोंदविण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल होऊन नियमित फौजदारी खटला क्रमांक ९०१/२०२३ सुरू झाला होता.
दरम्यान, राठी कुटुंबाने नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमित डी. भाटे यांनी बाजू मांडताना संबंधितांची भूमिका केवळ जमीन खरेदीदार म्हणून असल्याचे नमूद केले. व्यवहाराच्या सुरुवातीपासून फसवणुकीचा हेतू असल्याचे कोणतेही ठोस पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचा मुद्दाही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
प्रकरणातील सर्व कागदपत्रे, तपासाचा अभिलेख आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. तक्रारीतील आरोप गृहीत धरले तरी अर्जदारांविरुद्ध फसवणूक अथवा बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आवश्यक घटक स्पष्टपणे दिसून येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. केवळ व्यवहारात सहभागी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर फौजदारी जबाबदारी निश्चित करता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी दिलेल्या आदेशानुसार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७९९/२०२२ तसेच त्यातून निर्माण झालेली नियमित फौजदारी खटला क्रमांक ९०१/२०२३ मधील कार्यवाही धनराज बालकिशन राठी, श्रावण घनश्याम राठी आणि सुशील घनश्यामदास राठी यांच्या मर्यादित बाबतीत रद्द करण्यात आली. त्यामुळे दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या राठी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात अमरावती येथील न्यायालयीन कामकाजासाठी अॅड. मुर्त्यूझा आझाद यांनी तर नागपूर खंडपीठात अॅड. अमित डी. भाटे यांनी राठी कुटुंबाच्या वतीने काम पाहिले. सुनावणीदरम्यान मांडण्यात आलेला अॅड. भाटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने संबंधित अर्जदारांच्या बाजूने निर्णय दिला.
राठी कुटुंबावरील गुन्हा रद्द; उर्वरित आरोपींवरील कार्यवाही कायम
नागपूर खंडपीठाने अमरावतीतील जमीन व्यवहार प्रकरणात धनराज बालकिशन राठी, श्रावण घनश्याम राठी आणि सुशील घनश्यामदास राठी यांच्याविरुद्धचा गुन्हा व न्यायालयीन कार्यवाही रद्द केली आहे. तक्रारीतील आरोपांमधून फसवणुकीचे आवश्यक घटक स्पष्ट होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र, प्रकरणातील उर्वरित आरोपींविरुद्धची न्यायालयीन कार्यवाही कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात नागपूर खंडपीठात अॅड. अमित डी. भाटे यांनी तर अमरावती येथे अॅड. मुर्तुझा आझाद यांनी राठी कुटुंबाच्या वतीने कामकाज पाहिले.

More Stories
हॉटेलचालकांनो सावधान! तुकाराम मुंडेंचा अॅक्शन मोड; हॉटेल्स, ढाब्यांसाठी ‘हे’ ५ नियम आता बंधनकारक
पुण्याची ‘सोनम’! लोहगडावर तरुणाचा अपघात नव्हे तर खून; होणारी पत्नी आणि प्रियकर अटकेत
ठाणे ग्रामीण जिल्ह्यात भाडेकरू पडताळणी सक्तीची; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई