लोणावळा | प्रतिनिधी
लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला तरुणाचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे उघड झाल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या मित्राला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याचा काही दिवसांपूर्वी लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लोणावळा पोलिसांच्या सखोल तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा विवाह सिया गोयल हिच्याशी काही दिवसांत होणार होता. दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या काही काळापासून केतन आणि सिया यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यानंतर सियाने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
लोहगडावर रचला कट
घटनेच्या दिवशी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यांच्यामागोमाग चेतन चौधरीही तेथे पोहोचला होता. दरीच्या काठाजवळ तिघे एकत्र असताना चेतनने केतनला खाली ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.
व्यवसायातून झाली ओळख
पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयल बेकरी व्यवसायाशी संबंधित होती, तर चेतन चौधरी मार्केट यार्ड परिसरात ड्रायफ्रूट व्यवसाय करत होता. व्यवसायाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती आणि गेल्या सुमारे एका वर्षापासून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते.
दोघांना अटक
या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी याबाबत माहिती दिली.
तपास सुरू
या प्रकरणामागील नेमके कारण, कटाची आखणी कशी करण्यात आली आणि आणखी कोणी यात सहभागी होते का, याचा तपास लोणावळा पोलीस करत आहेत. अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेचे रूपांतर हत्येच्या गुन्ह्यात झाल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

More Stories
हॉटेलचालकांनो सावधान! तुकाराम मुंडेंचा अॅक्शन मोड; हॉटेल्स, ढाब्यांसाठी ‘हे’ ५ नियम आता बंधनकारक
अमरावतीच्या जमीन व्यवहार प्रकरणात राठी कुटुंबाला दिलासा; गुन्हा रद्द
ठाणे ग्रामीण जिल्ह्यात भाडेकरू पडताळणी सक्तीची; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई